Home » उद्योग-स्टार्टअप » E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल बाबतीत सरकारचा दावा तुम्हाला पटतो का? वाहन उत्पादकाचे मत देखील सरकारच्या बाजुने?

E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल बाबतीत सरकारचा दावा तुम्हाला पटतो का? वाहन उत्पादकाचे मत देखील सरकारच्या बाजुने?

ethanol-e20-petrol-facts
Facebook
Twitter
WhatsApp
इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांचे नुकसान होते, मायलेज मोठ्या प्रमाणात घटते किंवा कोट्यवधी वाहने निकामी होतील, अशा दाव्यांवर केंद्र सरकारने सविस्तर खुलासा केला आहे. वाहन उत्पादकांच्या सेवा नोंदी, तांत्रिक चाचण्या आणि प्रत्यक्ष वापरातील अनुभवाच्या आधारे E20 इंधन सुरक्षित असल्याचा सरकारचा दावा आहे.

इथेनॉल मिश्रित पेट्रोल (Ethanol Blended Petrol) संदर्भात सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांतून पसरत असलेल्या दाव्यांवर केंद्र सरकारने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या मते, E20 इंधनाविरोधातील अनेक दावे तांत्रिक पुराव्यांशिवाय करण्यात आले असून, उपलब्ध वैज्ञानिक अभ्यास, वाहन उत्पादकांचा अनुभव आणि प्रत्यक्ष वापरातील आकडेवारी यांमध्ये अशा दाव्यांना पुष्टी मिळालेली नाही.

सरकारने स्पष्ट केले की, भारतात इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम अचानक लागू करण्यात आलेला नाही. 2001 मध्ये प्रायोगिक स्तरावर सुरुवात झाल्यानंतर 2006 मध्ये E5 इंधन सुरू करण्यात आले. त्यानंतर आवश्यक उत्पादन क्षमता, वितरण व्यवस्था, तांत्रिक मानके आणि नियामक तयारी पूर्ण करत इथेनॉलचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आले.

इथेनॉल मिश्रणाचा प्रवास टप्प्याटप्प्याने

2013 ते 2014 या वर्षात सरासरी इथेनॉल मिश्रण केवळ सुमारे 1.53 टक्के होते. ते 2020 ते 2021 मध्ये सुमारे 8.1 टक्क्यांवर पोहोचले. त्यानंतर 2021 ते 2022 मध्ये 10 टक्के, 2022 ते 2023 मध्ये 12 टक्के, 2023 ते 2024 मध्ये 14.6 टक्के, 2024 ते 2025 मध्ये 19.2 टक्के आणि नोव्हेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीत सरासरी 20 टक्के मिश्रणाची पातळी गाठण्यात आली.

जुन्या वाहनांनाही मोठ्या प्रमाणावर अडचण आहे की नाही?

सरकारच्या माहितीनुसार, गेल्या अडीच ते साडेतीन वर्षांपासून E15 ते E20 इंधनाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या काळात देशभरातील सुमारे 20 कोटींहून अधिक दुचाकी आणि 3 कोटींपेक्षा अधिक पेट्रोल कार या इंधनावर चालल्या. तरीही E20 मुळे मोठ्या प्रमाणावर इंजिन निकामी होणे किंवा वाहन बंद पडल्याचे कोणतेही अधिकृत आणि व्यापक पुरावे समोर आलेले नाहीत.

ALSO READ:  Blinkit, Zepto आणि Swiggyला मोठा झटका; महाराष्ट्र FDAची 12 वेअरहाऊसवर कारवाई

भारतात दररोज सुमारे 8 कोटी वाहने पेट्रोल पंपांवर इंधन भरतात. या व्यापक वापराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर तक्रारी, वॉरंटी दावे किंवा विशेष सेवा मोहीमा दिसल्या असत्या, मात्र तसे घडले नसल्याचे सरकारने नमूद केले आहे.

वाहन उत्पादकांनीही व्यक्त केला विश्वास

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025 ते 2026 मध्ये एका प्रमुख वाहन उत्पादकाने 2.84 कोटी वाहनांना सेवा दिली. त्यामध्ये सुमारे 1.5 कोटी वाहने मूळतः E20 प्रमाणित नव्हती. तरीही E20 मुळे गंज, अतिरिक्त झीज किंवा वाहनाच्या भागांचे आयुष्य कमी झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

दुसऱ्या एका वाहन उत्पादकाने 1.4 कोटी E20 वापरणाऱ्या वाहनांच्या दीर्घकालीन निरीक्षणातही इथेनॉलमुळे गंज झाल्याचे कोणतेही संकेत मिळाले नसल्याचे सरकारने सांगितले आहे. प्रमुख दुचाकी उत्पादकांचाही अनुभव याच निष्कर्षाला पाठिंबा देणारा असल्याचे नमूद करण्यात आले.

4 जुलैच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्योगाची भूमिका स्पष्ट

4 जुलै 2026 रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, अवजड उद्योग मंत्रालय आणि रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रमुख वाहन उत्पादकांनी E20 कार्यक्रमाला पाठिंबा दर्शविला.

टोयोटा किर्लोस्करने E20 इंधन जागतिक स्तरावर अनेक वर्षांपासून वापरले जात असून ते कठोर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तपासले जाते, असे सांगितले.

ALSO READ:  मखान्याची बाजारपेठ 12 हजार कोटींवर जाणार; उत्पादनाला वेग, सरकारकडून 476 कोटींची योजना

मारुती सुझुकीने 2.84 कोटी वाहनांच्या सेवा आकडेवारीच्या आधारे E20 मुळे कोणतीही असामान्य झीज किंवा गंज आढळला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मायलेजमध्ये होणारी घट साधारण 3 ते 3.5 टक्क्यांपर्यंत मर्यादित असल्याचे सांगत वाहन चालविण्याची पद्धत, टायरमधील हवेचा दाब, देखभाल आणि वाहतूक परिस्थिती यांचा मायलेजवर अधिक परिणाम होत असल्याचे नमूद केले.

हिरो मोटोकॉर्पनेही आपल्या सेवा नोंदींमध्ये E20 वापरणाऱ्या वाहनांमध्ये अतिरिक्त नुकसान झाल्याचे आढळले नसल्याचे सांगितले. तसेच ह्युंदाई, TVS मोटर कंपनी आणि बजाज ऑटो यांनीही E20 कार्यक्रमावरील विश्वास व्यक्त केला.

मायलेजबाबत काय म्हणते सरकार?

सरकारच्या मते, मायलेजवर अनेक घटकांचा परिणाम होतो. वाहन चालविण्याची शैली, वाहतुकीची परिस्थिती, वाहनाची देखभाल, टायरमधील हवा आणि एअर कंडिशनरचा वापर हे महत्त्वाचे घटक आहेत.

जुन्या E10 डिझाइन वाहनांमध्ये इंधन कार्यक्षमतेत साधारण 3 ते 5 टक्क्यांपर्यंत मर्यादित घट होऊ शकते. मात्र सोशल मीडियावर फिरत असलेले अतिशयोक्त दावे चुकीचे असल्याचे सरकारने म्हटले आहे. याउलट E20 मुळे अधिक ऑक्टेन रेटिंग, चांगले अँटी नॉक गुणधर्म, स्वच्छ ज्वलन आणि अधिक सुरळीत इंजिन कार्यप्रदर्शन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

इंधन गुणवत्तेवरही सरकारचा भर

सरकारच्या माहितीनुसार, देशभरातील 30 हजारांहून अधिक पेट्रोल पंपांवर नियमित इंधन गुणवत्ता तपासणी केली जाते. भारतीय मानक ब्युरोच्या निकषांनुसार E20 इंधनाची गुणवत्ता तपासली जाते आणि इंधन भेसळीबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाते.

सरकारच्या स्पष्टीकरणाच्या विरोधात सोशल मीडियावर आणि अनेक वाहनधारकांकडूनही वेगळे अनुभव मांडले जात आहेत. त्यामुळे हा विषय एकतर्फी नसून दोन्ही बाजू समजून घेणे महत्त्वाचे आहे.

E20 पेट्रोलबाबत सर्वसामान्यांचे आक्षेप काय?

देशात E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर वाढल्यानंतर अनेक वाहनधारकांनी सोशल मीडिया, वाहन मालकांचे मंच आणि यूट्यूबवरील चर्चांमधून विविध तक्रारी मांडल्या आहेत. विशेषतः 2023 पूर्वीची वाहने वापरणाऱ्या ग्राहकांकडून इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचा दावा केला जात आहे.

मायलेज कमी झाल्याचा दावा

सर्वाधिक चर्चेत असलेली तक्रार म्हणजे वाहनाचे मायलेज कमी झाल्याची. अनेक कार आणि दुचाकी मालकांच्या मते E20 पेट्रोल वापरल्यानंतर पूर्वीच्या तुलनेत 5 ते 10 टक्के, तर काहींच्या मते त्याहून अधिक मायलेज घटले आहे. सरकार आणि वाहन उत्पादक हा परिणाम साधारण 3 ते 5 टक्क्यांपर्यंत मर्यादित असल्याचे सांगतात, मात्र अनेक ग्राहक हा दावा मान्य करत नाहीत.

इंजिन नॉकिंग आणि पिकअप कमी

काही वाहनधारकांच्या मते जुन्या वाहनांमध्ये इंजिन नॉकिंग, पिकअप कमी होणे, कोल्ड स्टार्टमध्ये अडचण आणि आयडलिंग अस्थिर होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. विशेषतः 10 वर्षांहून अधिक जुनी वाहने वापरणाऱ्यांकडून अशा तक्रारी वारंवार समोर येतात.

ALSO READ:  आता अल्जेरियातून दरमहा 55 हजार टन LPG आयात

रबर आणि प्लास्टिक भागांवर परिणाम

वाहन दुरुस्ती करणाऱ्या काही मेकॅनिकांचे म्हणणे आहे की जुन्या वाहनांतील फ्युएल पाईप, रबर सील, गॅस्केट आणि प्लास्टिकचे काही भाग इथेनॉलमुळे लवकर खराब होऊ शकतात. इथेनॉलमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असल्याने दीर्घकाळ वापरात काही भागांवर परिणाम होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे.

दुरुस्तीचा वाढलेला खर्च

काही वाहनधारकांच्या मते फ्युएल पंप, इंजेक्टर, फिल्टर किंवा इंधन प्रणालीशी संबंधित बिघाडांमुळे देखभाल खर्च वाढला आहे.

 

Gold and Silver price

टॉप स्टोरी

नक्की वाचा