LIC च्या OFS च्या पहिल्याच दिवशी इश्यूला 3.3 पट प्रतिसाद मिळाल्याने केंद्र सरकारने अतिरिक्त 50.6 कोटी शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला सरकारला सुमारे ₹31,400 कोटी ते ₹31,600 कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.या ऑफरमधील 10% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हा भाग 5 ऑगस्ट 2026 रोजी उपलब्ध असेल आणि वैध बोली प्राप्त झाल्यास त्याचे वाटप केले जाईल.
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या ऑफर फॉर सेल (OFS) ला संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्यानंतर केंद्र सरकारने ग्रीन शू पर्याय वापरत अतिरिक्त 4 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण विक्रीचा आकार 82.2 कोटी शेअर्सपर्यंत वाढला असून सरकारला सुमारे ₹31,400 कोटी ते ₹31,600 कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.
LIC च्या OFS च्या पहिल्याच दिवशी इश्यूला 3.3 पट प्रतिसाद मिळाल्याने केंद्र सरकारने अतिरिक्त 50.6 कोटी शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला 31.6 कोटी शेअर्स म्हणजेच कंपनीतील 2.5 टक्के हिस्सा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. ग्रीन शू पर्यायाचा वापर केल्यानंतर आता एकूण ऑफर 82.2 कोटी शेअर्सपर्यंत पोहोचली आहे.
या विक्रीसाठी प्रति शेअर ₹382 हा आधारभूत दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, NSE वरील सूचक किंमत ₹383.84 इतकी होती. या दराने संपूर्ण इश्यूची विक्री झाल्यास सरकारला जवळपास ₹31,600 कोटींचा निधी मिळू शकतो.
संस्थात्मक गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद
OFS च्या पहिल्या दिवशी केवळ बिगर किरकोळ गुंतवणूकदारांना अर्ज करण्याची परवानगी होती. दिवसअखेर सुमारे 94.5 कोटी शेअर्ससाठी मागणी नोंदवण्यात आली, जी उपलब्ध ऑफरपेक्षा लक्षणीय जास्त होती. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी अर्ज प्रक्रिया बुधवारी खुली करण्यात आली आहे.
एकूण ऑफरपैकी 8.2 कोटी शेअर्स म्हणजे 10 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच LIC च्या कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख शेअर्स आरक्षित आहेत.

निर्गुंतवणूक लक्ष्याकडे सरकारची वाटचाल
निर्गुंतवणूक विभागाचे सचिव अरुणीश चावला यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा भारतीय भांडवली बाजारावरील विश्वासाचे प्रतीक आहे. या मजबूत मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ग्रीन शू पर्यायाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
या व्यवहारानंतर चालू आर्थिक वर्षातील सरकारची निर्गुंतवणूक प्राप्ती ₹50,000 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. यापैकी ₹28,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम या व्यवहारातून मिळाली आहे. चालू वर्षासाठी सरकारने ₹80,000 कोटी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले असून, मालमत्ता मुद्रीकरणातून आतापर्यंत ₹6,000 कोटींपेक्षा अधिक निधी मिळाला आहे.
शेअरवर दबाव
बाजारात मोठ्या प्रमाणात नवीन LIC शेअर्स उपलब्ध होणार असल्याने शेअरच्या किमतीवर दबाव दिसून आला. मंगळवारी BSE वर LIC चा शेअर सुमारे 8 टक्क्यांनी घसरून ₹391 वर बंद झाला. हा दर OFS च्या ₹382 च्या ऑफर किमतीपेक्षा काहीसा जास्त असला तरी वाढलेल्या पुरवठ्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.







