भारतीय भांडवली बाजारात एक नवा आणि वेगळा पायंडा पाडत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) ‘बीएसई इंडेक्स सर्व्हिसेस’ या पूर्ण मालकीच्या subsidiery कंपनीने जून २०२६ मध्ये देशातील पहिला पारंपरिक सात्विक तत्त्वे आणि मूल्य-आधारित नैतिक गुंतवणुकीवर (value-based ethical investing) आधारित ‘बीएसई सात्विक १००’ (BSE Saatvik 100) इंडेक्स लाँच केला आहे.
आजवर भांडवली बाजारात केवळ कंपन्यांच्या नफा कमवण्याच्या क्षमतेवर आणि आर्थिक आकडेवारीवर भर दिला जात असे. मात्र, ‘बीएसई सात्विक १००’ या नव्या निर्देशांकाने या पारंपारिक चौकटीत मोठा बदल घडवून आणला आहे. हा इंडेक्स केवळ संपत्ती निर्मितीपुरता मर्यादित नसून, तो गुंतवणूकदारांच्या सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भावनांशी मेळ घालणारा एक परिपक्व पर्याय ठरत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘ईएसजी’ (ESG – Environmental, Social and Governance) या संकल्पनेपेक्षा ही पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. हा इंडेक्स शुद्धता, अहिंसा, संयम आणि जाणीवपूर्वक जीवनशैली या भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर आधारलेला असून, यामुळे कॉर्पोरेट जगतात नैतिकतेला अधिक बळ मिळेल यात शंका नाही.
या इंडेक्समध्ये कंपन्यांची निवड करताना दोन टप्प्यांमधून प्रक्रिया पार पाडली जाते
पहिली पायरी – नकारात्मक नैतिक स्क्रिनिंग (सात्विक फिल्टर): वित्तीय निकषांपूर्वी कंपन्यांवर सात्विक तत्त्वांच्या आधारे सांस्कृतिक व नैतिक पडताळणी केली जाते. यादरम्यान खालील व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना काटेकोरपणे वगळले जाते:
1) दारू, तंबाखू आणि अंमली पदार्थांचे उत्पादन किंवा व्यवसाय.
2) जुगार, बेटिंग आणि कॅसिनो चालवणारे व्यवसाय.
3) अहिंसेच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारे किंवा सजीवांबद्दल करुणा नसणारे व्यवसाय (उदा. मांस प्रक्रियेचे उद्योग किंवा तत्सम उत्पादने).
दुसरी पायरी – वित्तीय मानांकन आणि भांडवलीकरण: निकषांवर खरे उतरलेल्या कंपन्यांना त्यांच्या फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन आणि तरलता (liquidity) या आधारावर मानांकण दिले जाते, ज्यामधील शीर्ष १०० कंपन्या अंतिम इंडेक्सचा भाग बनतात.
इंडेक्सची रचना आणि कार्यप्रणाली
हा नवीन इंडेक्स गुंतवणूकदारांच्या धोरणात्मक उद्दिष्टांना तात्त्विक, सांस्कृतिक आणि नैतिक प्राधान्यक्रमांशी जोडणारा एक मजबूत आर्थिक आराखडा तयार करतो. या इंडेक्सची प्रमुख वैशिष्ट्ये आणि कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे:
युनिव्हर्स आणि आकार: व्यापक अशा ‘बीएसई ५००’ इंडेक्समधून १०० सर्वोत्तम शेअर्सची निवड या इंडेक्ससाठी केली जाते.
बेस तारीख आणि मूल्य: या इंडेक्सचे बेस मूल्य १,००० निश्चित करण्यात आले असून, बॅक-टेस्टेड बेस तारीख २० जून २००५ आहे.
पुनर्संतुलन (Rebalancing): या इंडेक्सचे दर सहा महिन्यांनी म्हणजेच जून आणि डिसेंबरमध्ये पुनरावलोकन करून पुनर्संतुलन केले जाते.
प्रमुख कंपन्या
हा इंडेक्स मुख्य प्रवाहात विविध क्षेत्रांमध्ये विस्तृत विविधीकरण राखतो, ज्यामध्ये प्रामुख्याने लार्ज-कॅप कंपन्यांचा मोठा भरणा आहे:
प्रमुख क्षेत्रे आणि त्यांचे वजन:
वित्तीय सेवा (~३७.५५%),
ग्राहक विवेकसुविधा (~११.५२%),
ऊर्जा (~११.१४%),
माहिती तंत्रज्ञान (~८.३१%), तसेच
वस्तू आणि उद्योग (~७.८५% प्रत्येक).
प्रमुख कंपन्या (Constituents):
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा यात समावेश आहे.
ऐतिहासिक कामगिरी आणि भविष्यातील गुंतवणूक संधी
बॅक-टेस्टेड आकडेवारीनुसार, या इंडेक्सने १० वर्षांचे वार्षिक एकूण रिटर्न्स सुमारे १३.७० टक्के, ५ वर्षांचे वार्षिक रिटर्न्स सुमारे ११.११ टक्के आणि ३ वर्षांचे वार्षिक रिटर्न्स सुमारे १२.२२ टक्के दिले आहेत. जरी ही ऐतिहासिक आकडेवारी भविष्यातील नफ्याची शाश्वती देत नसली, तरी त्याची मजबूत पार्श्वभूमी गुंतवणूकदारांना नक्कीच आत्मविश्वास देणारी ठरते.
येत्या काळात या इंडेक्सवर आधारित एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF), इंडेक्स म्युच्युअल फंड्स आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस (PMS) यांसारखी आधुनिक गुंतवणूक उत्पादने बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी,
गुंतवणूकदारांना आपल्या मूल्यांची जपणूक करत दीर्घकालीन संपत्ती उभारणी करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग खुला झाला आहे.







