देशातील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने साखर डीलर्सवर साठा मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध राहण्यास मदत होणार असून बाजारातील अनावश्यक दरवाढीवरही नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे.
साखर बाजारात पारदर्शकता राखणे, ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे आणि देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवणे या उद्देशाने केंद्र सरकारने साखर डीलर्ससाठी स्टॉक होल्डिंग लिमिट लागू करण्याची घोषणा केली आहे. हा आदेश 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार असून तो 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत प्रभावी राहील.ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय ने पत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे.
सरकारच्या निरीक्षणानुसार, अलीकडील काळात साखरेच्या एक्स मिल दरात झालेली वाढ ही प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठ्याच्या परिस्थितीशी सुसंगत नव्हती. काही व्यापारी, डीलर्स आणि बाजारातील मध्यस्थांकडून साठेबाजी, सट्टेबाजी आणि प्रत्यक्ष साखर हलविल्याशिवाय केवळ कागदोपत्री व्यवहार केल्यामुळे बाजारात कृत्रिम टंचाईचे वातावरण निर्माण झाल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.
साखर साठ्याची साप्ताहिक माहिती देणे बंधनकारक
सरकारच्या नव्या आदेशानुसार, सर्व साखर डीलर्सना त्यांच्या ताब्यातील साखरेचा साठा जाहीर करणे बंधनकारक असेल. तसेच दर आठवड्याला अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या ऑनलाइन पोर्टलवर साठ्याची अद्ययावत माहिती अपलोड करावी लागेल.
यामुळे सरकारला बाजारातील साखरेच्या उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवणे शक्य होणार असून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचे प्रयत्न तातडीने ओळखून कारवाई करता येणार आहे.
ग्राहकांना दिलासा
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात साखरेचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अतिरिक्त खरेदी करण्याची आवश्यकता नाही. बाजारात साखरेचा नियमित पुरवठा कायम राहील आणि आवश्यकतेनुसार सरकार पुढील उपाययोजनाही करेल.
बाजारावर काय परिणाम होऊ शकतो?
या निर्णयामुळे साखरेतील सट्टेबाजी आणि अनावश्यक साठेबाजीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येण्याची शक्यता आहे. परिणामी घाऊक आणि किरकोळ बाजारातील दरातील अस्थिरता कमी होऊ शकते. साखर उद्योग, व्यापारी आणि वितरकांना अधिक पारदर्शक पद्धतीने व्यवहार करावे लागतील, तर ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध होण्यास मदत होईल.







