राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजचा सुमारे ३० हजार कोटींचा मोठा आयपीओ लवकरच येणार आहे. सार्वजनिक सबस्क्रिप्शन १८ सप्टेंबरला सुरू होईल आणि शेअर्स २५ सप्टेंबरला लिस्ट होण्याची शक्यता आहे. हा आयपीओ यशस्वी झाल्यास तो भारतीय बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सार्वजनिक IPO ठरेल.
राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंज (NSE) चा दीर्घकाळ प्रलंबित आयपीओ आता अंतिम टप्प्यात आला आहे. सुमारे ३० हजार कोटी रुपये उभारण्याचा हा सार्वजनिक निर्गम १८ सप्टेंबरला गुंतवणूकदारांसाठी उघडण्याची शक्यता आहे. शेअर्सची बाजारातील पहिली एन्ट्री २५ सप्टेंबरला होऊ शकते.
प्राइस बँड आणि अँकर बुकिंग
आयपीओचा किंमत पट्टा (प्राइस बँड) १५ सप्टेंबरला जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर १७ सप्टेंबरला अँकर इन्व्हेस्टर्ससाठी बुकिंग प्रक्रिया होईल. त्यानंतर तीन दिवसांचा सार्वजनिक सबस्क्रिप्शन कालावधी १८ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत चालेल. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी बाजाराला या तारखांची माहिती मिळाली आहे.
Face Value रू.१/-
हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) स्वरूपाचा असेल. त्यात एकूण १४.८९ कोटी इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होतील. प्रत्येक शेअरचा फेस व्हॅल्यू एक रुपये असून, हे शेअर्स एनएसईच्या एकूण पेड-अप इक्विटी कॅपिटलच्या सुमारे सहा टक्के भाग दर्शवतात. फ्रेश इश्यू नसल्याने या निर्गमातून मिळणारा संपूर्ण निधी विद्यमान शेअरहोल्डर्सकडे जाईल. एक्स्चेंजला थेट कोणताही निधी मिळणार नाही.
जर हा आयपीओ यशस्वी झाला तर तो २०२४ मध्ये झालेल्या ह्युंदाई मोटर इंडियाच्या २७,८७० कोटी रुपयांच्या निर्गमापेक्षा मोठा ठरेल आणि भारतीय बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ होईल. गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ महत्त्वाचा आहे कारण तो देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजच्या मालकीतील काही भाग सार्वजनिक करतो. यामुळे बाजारातील भांडवली ओघ आणि गुंतवणूकदारांच्या सहभागातही वाढ होण्याची शक्यता आहे.
बाजरात उस्तुकता क़ायम
सध्या बाजारात या आयपीओबाबत उत्सुकता कायम आहे. अधिकृत प्राइस बँड आणि तारखा जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांना अधिक स्पष्ट चित्र मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला हा निर्गम यशस्वी झाल्यास भारतीय भांडवली बाजारासाठी तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.







