नव्या नियमांनुसार बँकांना समान रकमेच्या आणि एकाच दिवशी स्वीकारलेल्या ठेवींवर सर्व शाखांमध्ये समान व्याजदर द्यावा लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठेवींवरील व्याजदराच्या नियमांमध्ये मोठे बदल केले असून, या नव्या चौकटीमुळे FD ग्राहकांसाठी दर निश्चिती अधिक पारदर्शक होणार आहे. त्याचवेळी मोठ्या ठेवींवरील दर ठरवताना बँकांना तरलतेच्या जोखमीचा विचार करण्याची अधिक मुभा मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेने Reserve Bank of India Interest Rate on Deposits Directions, 2025 मध्ये सुधारणा केली आहे. जूनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या मसुदा नियमांवर मिळालेल्या सूचनांचा विचार करून अंतिम नियम तयार करण्यात आले आहेत. हे बदल १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होतील.
FD ग्राहकांसाठी या बदलाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शाखानिहाय व्याजदरातील संभाव्य फरकाला आळा बसणार आहे. एखाद्या बँकेत एकाच दिवशी समान रकमेची ठेव स्वीकारली गेली, तर ग्राहकाने कोणत्याही शाखेत ठेव केली तरी त्याला समान व्याजदर मिळणे आवश्यक असेल. समान परिस्थितीत ग्राहकांमध्ये भेदभाव करता येणार नाही.
FD दर आधीच जाहीर करावे लागणार
बँकांना किरकोळ ठेवींसाठीचे व्याजदर वेळेआधी आपल्या वेबसाइटवर जाहीर करावे लागतील. त्यानंतर ठेवीवर लागू होणारे व्याज प्रकाशित दरानुसारच द्यावे लागेल.
यामुळे FD करण्यापूर्वी ग्राहकांना उपलब्ध व्याजदरांची तुलना करणे सोपे होणार आहे. शाखेत जाऊन वेगळा दर मिळेल की नाही, याबाबतची अनिश्चितताही कमी होण्याची शक्यता आहे.

मोठ्या ठेवींवर बँकांना अधिक लवचिकता
नव्या चौकटीत मोठ्या म्हणजेच Bulk Deposits च्या व्याजदरांबाबत बँकांना अधिक लवचिकता देण्यात आली आहे. Liquidity Coverage Ratio म्हणजेच LCR अंतर्गत संबंधित ठेवीमुळे निर्माण होणाऱ्या तरलता जोखमीनुसार बँका व्याजदर ठरवू शकतील.
रुपयांमध्ये असलेल्या अनिवासी व्यक्तींच्या ठेवींनाही ही लवचिकता लागू होणार आहे. त्यामुळे बँकांना त्यांच्या निधीची गरज, तरलता आणि संबंधित जोखीम लक्षात घेऊन मोठ्या ठेवींचे दर ठरवणे शक्य होईल.
Bulk Deposit चे दर दररोज वेबसाइटवर
बँकांना Bulk Deposit वरील व्याजदर प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत वेबसाइटवर जाहीर करावे लागतील. यासाठी सकाळी १० वाजून १० मिनिटांपर्यंतची सवलत देण्यात आली आहे.
वेबसाइटवर ज्या दरांची माहिती दिली जाईल, त्याच दरानुसार ठेवीवरील व्याज देणे बँकांसाठी बंधनकारक असेल. त्यामुळे मोठ्या ठेवींच्या बाजारातही दरांची माहिती अधिक स्पष्टपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
कोणत्या बँकांना लागू होणार?
RBI चे सुधारित Deposit Interest Rate नियम व्यावसायिक बँका, Small Finance Banks, Regional Rural Banks, Local Area Banks, Payment Banks आणि Urban Cooperative Banks यांना लागू होणार आहेत.







