व्यावसायिक वाहन क्षेत्रातील उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी SML महिंद्रा लिमिटेडने महिंद्रा अँड महिंद्राच्या ट्रक आणि बस विभागाचे ₹525 कोटींमध्ये अधिग्रहण करण्यास संचालक मंडळाची मंजुरी दिली आहे. या व्यवहारामुळे महिंद्रा समूहाच्या ट्रक आणि बस व्यवसायाचे एकाच कंपनीअंतर्गत एकत्रीकरण होणार आहे.
पूर्वी SML इसुझू लिमिटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SML महिंद्रा लिमिटेडच्या संचालक मंडळाने महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या Mahindra Truck and Bus Division (MTBD) या व्यवसायाचे अधिग्रहण करण्यास मंजुरी दिली आहे.
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार हा व्यवहार Business Transfer Agreement अंतर्गत Slump Sale पद्धतीने होणार आहे. या अधिग्रहणामध्ये कर्मचारी, मालमत्ता, बौद्धिक संपदा, परवाने, करार तसेच संबंधित दायित्वांचाही समावेश असेल.
या व्यवहाराची किंमत ₹525 कोटी निश्चित करण्यात आली असून, कार्यरत भांडवलातील अंतिम समायोजनानुसार त्यात बदल होऊ शकतो. आवश्यक नियामक आणि भागधारकांच्या मंजुरीनंतर हा व्यवहार 31 जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचा कंपनीचा मानस आहे.
एकाच छताखाली ट्रक आणि बस व्यवसाय
महिंद्रा समूहाने ऑगस्ट 2025 मध्ये SML महिंद्रामध्ये 58.97 टक्के हिस्सा विकत घेतल्यानंतर हा पुढील महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय मानला जात आहे.
या व्यवहारामुळे हलकी, मध्यम आणि जड व्यावसायिक वाहने तसेच बस या सर्व विभागांचा व्यवसाय एकाच कंपनीअंतर्गत येईल. त्यामुळे उत्पादन विकास, विक्री जाळे, तंत्रज्ञान, खर्च व्यवस्थापन आणि ग्राहक सेवा या क्षेत्रांत अधिक समन्वय साधता येईल.
महिंद्रा समूहाचे ग्रुप CEO आणि MD अनिश शाह यांनी सांगितले की, या निर्णयामुळे समूहाच्या व्यावसायिक वाहन व्यवसायाची रचना अधिक सुलभ होईल आणि ट्रक व बस क्षेत्रात मजबूत नेतृत्व निर्माण करण्यास मदत मिळेल.
महिंद्रा अँड महिंद्राचे Auto आणि Farm Sector चे CEO राजेश जेजुरीकर यांनी सांगितले की, SML महिंद्रा आणि महिंद्रा ट्रक अँड बस या दोन्ही संस्थांची ताकद एकत्र आल्याने तंत्रज्ञान, उत्पादन क्षमता, ग्राहक सेवा आणि बाजारपेठ विस्तार यामध्ये मोठे फायदे मिळतील. दोन्ही ब्रँडची स्वतंत्र ओळख कायम ठेवत अधिक मूल्य निर्माण करण्यावर भर दिला जाईल.
शेअरमध्ये 20 टक्क्यांची उसळी
या घोषणेनंतर SML महिंद्राच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली. बुधवारी बीएसईवर कंपनीचा शेअर 20 टक्क्यांनी वाढून ₹4,565 वर बंद झाला. मागील सत्रात हा शेअर ₹3,804 वर बंद झाला होता.
व्यवहारादरम्यान शेअरने ₹5,341 हा नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 52 आठवड्यांचा नीचांक ₹2,700 इतका आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल सुमारे ₹6,607.03 कोटी आहे.
या एकत्रीकरणामुळे SML महिंद्राकडे व्यावसायिक वाहन क्षेत्रातील अधिक व्यापक उत्पादन पोर्टफोलिओ उपलब्ध होईल. ट्रक आणि बस व्यवसायासाठी स्वतंत्र आणि केंद्रित कंपनी तयार झाल्याने भविष्यात बाजारातील स्पर्धात्मक क्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तंत्रज्ञान, उत्पादन कार्यक्षमता आणि ग्राहक सेवा यामध्ये होणाऱ्या सुधारणा कंपनीच्या दीर्घकालीन वाढीस चालना देऊ शकतात.







