देशभरातील बँकांमध्ये सुमारे ₹78,000 कोटींच्या अनक्लेम्ड ठेवी पडून असल्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारच्या ‘Your Money, Your Right’ उपक्रमांतर्गत RBI चे UDGAM पोर्टल नागरिकांना अशा विसरलेल्या बँक ठेवी शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देते. 10 वर्षांहून अधिक काळ व्यवहार न झालेल्या खात्यांतील रक्कम DEA Fund मध्ये वर्ग केली जात असली, तरी त्या पैशांवरील ग्राहकांचा हक्क कायम राहतो.
बँकांमध्ये अनक्लेम्ड ठेवी कशा तयार होतात?
नोकरीसाठी स्थलांतर, पत्ता किंवा मोबाईल क्रमांक बदलणे, जुन्या खात्यांची माहिती विसरणे, खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर वारसांना खात्याची माहिती नसणे किंवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसणे अशा अनेक कारणांमुळे बँकांमधील ठेवी वर्षानुवर्षे दावा न होता पडून राहतात. यामध्ये बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव (FD) आणि आवर्ती ठेव (RD) यांचा समावेश होतो.
10 वर्षांनंतरही पैसे सुरक्षित राहतात
एखाद्या बँक खात्यात सलग 10 वर्षे कोणताही व्यवहार झाला नाही आणि ठेव रक्कमेवर दावा करण्यात आला नाही, तर ती रक्कम Depositor Education and Awareness (DEA) Fund मध्ये वर्ग केली जाते. मात्र याचा अर्थ ग्राहकाचा पैसा जप्त होतो असा नाही. त्या रकमेवरील मालकी हक्क कायम खातेदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांचाच राहतो आणि त्यावर कोणतीही कालमर्यादा न ठेवता दावा करता येतो.
UDGAM पोर्टलवर कशी कराल पडताळणी?
भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेले UDGAM पोर्टल नागरिकांना सहभागी बँकांमधील अनक्लेम्ड ठेवी एकाच ठिकाणी शोधण्याची सुविधा देते. पोर्टलवर संबंधित माहिती मिळाल्यानंतर दावा मात्र संबंधित बँकेकडेच करावा लागतो.
‘Your Money, Your Right’ उपक्रमाचा उद्देश
वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने ऑक्टोबर 2025 मध्ये ‘आपकी पूंजी, आपका अधिकार – Your Money, Your Right’ हा देशव्यापी जनजागृती आणि सुविधा उपक्रम सुरू केला. RBI, IRDAI, SEBI, IEPFA आणि PFRDA यांच्या सहकार्याने नागरिकांना त्यांच्या हक्काचे आर्थिक दावे शोधणे आणि परत मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
मोहिमेत आतापर्यंत काय साध्य झाले?
ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत देशातील 668 जिल्ह्यांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. या मोहिमेद्वारे जवळपास ₹2,000 कोटी रक्कम तिच्या मूळ हक्कदारांना परत मिळवून देण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच नामनिर्देशन (Nomination), KYC अद्ययावत ठेवणे आणि आर्थिक नोंदी व्यवस्थित जपण्याबाबतही मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.
अनक्लेम्ड ठेवींचा प्रश्न केवळ विसरलेल्या बँक खात्यांचा नाही, तर प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, वारसदार आणि अनेक वर्षांपूर्वी वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडलेले ग्राहक यांनी UDGAM पोर्टलवर वेळोवेळी तपासणी करणे उपयुक्त ठरू शकते. योग्य KYC, अद्ययावत संपर्क माहिती आणि खात्यांमध्ये Nomination नोंदवून ठेवणे ही भविष्यात अनक्लेम्ड ठेवी निर्माण होऊ नयेत यासाठीची सर्वात प्रभावी उपाययोजना आहे.







