Home » उद्योग-स्टार्टअप » भारत टॅक्सीला देशभरात 7.97 लाख चालक जोडले; झिरो कमिशन मॉडेलमुळे संपूर्ण भाडे चालकांच्या खात्यात

भारत टॅक्सीला देशभरात 7.97 लाख चालक जोडले; झिरो कमिशन मॉडेलमुळे संपूर्ण भाडे चालकांच्या खात्यात

bharat-taxi-driver-partners-zero-commission-model
Facebook
Twitter
WhatsApp
सहकारी संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या भारत टॅक्सी या डिजिटल मोबिलिटी प्लॅटफॉर्मने दिल्ली एनसीआर, गुजरात आणि महाराष्ट्रात अधिकृतपणे सेवा सुरू केली आहे. देशभरात जवळपास 7.97 लाख चालक या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले असून झिरो कमिशन मॉडेलमुळे प्रवासाचे संपूर्ण भाडे चालकांनाच मिळणार आहे.

सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड (STCL) या बहुराज्य सहकारी संस्थेद्वारे संचालित भारत टॅक्सी अॅपची अधिकृत सुरुवात दिल्ली एनसीआर, गुजरात आणि महाराष्ट्रात करण्यात आली आहे. 19 जुलै 2026 पर्यंत देशभरात 7.97 लाख चालक भागीदार, म्हणजेच ‘सारथी’, या प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत झाले आहेत.

दिल्ली एनसीआरमध्ये सर्वाधिक 2.55 लाख सारथी जोडले गेले आहेत. गुजरातमध्ये ही संख्या 1.01 लाख असून महाराष्ट्रात 71,095 चालक या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत.

टप्प्याटप्प्याने देशभर विस्तार

STCL ने स्पष्ट केले आहे की इतर राज्ये आणि शहरांमध्ये सेवा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक गरज, आवश्यक सरकारी मंजुरी, कायदेशीर प्रक्रिया, चालकांची उपलब्धता तसेच संबंधित राज्य सरकारे, सहकारी संस्था आणि इतर भागधारकांशी समन्वय यावर आधारित घेतला जाणार आहे.

झिरो कमिशन मॉडेलची खासियत

भारत टॅक्सीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे झिरो कमिशन मॉडेल. या व्यवस्थेत प्रवासातून मिळणाऱ्या भाड्यातून कोणतेही कमिशन कापले जात नाही. चालकांकडून केवळ तंत्रज्ञान, अॅप देखभाल आणि प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी स्वतंत्र स्वरूपात नाममात्र प्लॅटफॉर्म वापर शुल्क घेतले जाते. त्यामुळे चालकाला मिळणाऱ्या भाड्यावर कोणताही परिणाम होत नाही.

चालकांसाठी विमा, कर्ज आणि प्रशिक्षण

सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडचे सदस्य असलेल्या सारथींना सहकारी संस्थेच्या नियमांनुसार विविध सुविधा उपलब्ध होतात. यामध्ये सवलतीच्या दरात आरोग्य व वैयक्तिक अपघात विमा, एसबीआय मुद्रा कर्ज, वाहन खरेदीसाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज सुविधा यांचा समावेश आहे.

याशिवाय डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर, ग्राहक सेवा, रस्ता सुरक्षा आणि प्रवासी सुरक्षेसंदर्भात वेळोवेळी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रमही आयोजित केले जातात.

भारत टॅक्सीचे सहकारी मॉडेल हे पारंपरिक अॅग्रिगेटर मॉडेलला पर्याय म्हणून पुढे येत आहे. कमिशनमुक्त व्यवस्था, आर्थिक सहाय्य आणि सामाजिक सुरक्षा सुविधा यामुळे चालकांचे उत्पन्न वाढवण्यास तसेच सहकार क्षेत्राला डिजिटल मोबिलिटीमध्ये नवे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.

Gold and Silver price

टॉप स्टोरी

नक्की वाचा