खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या ‘आयडीएफसी फर्स्ट बँकेने’ आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२६) अत्यंत चमकदार कामगिरी नोंदवली असून, बँकेच्या व्यावसायिक विस्ताराचा सविस्तर लेखाजोखा समोर आला आहे.
तिमाहीत बँकेचा स्टँडअलोन नेट प्रॉफिट वार्षिक आधारावर तब्बल १३२.२% (किंवा दुप्पट होऊन) १,०७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने ४६३ कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला होता. या अभूतपूर्व वाढीमागे बँकेचे बळकट कोर लेंडिंग बिजनेस आणि प्रभावी महसूल स्रोत मुख्य कारण ठरले आहेत.
बँकेच्या मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या नेट इंटरेस्ट इनकममध्ये (NII) २१% ची वाढ झाली असून, ती ५,९७२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे (मागील वर्षी याच तिमाहीत ती ४,९३३ कोटी रुपये होती). याशिवाय, बँकेचा नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) सुधारून ५.९६% झाला आहे, जो मागील वर्षी ५.७१% होता. तिमाही-दर-तिमाही आधारावरही यात ३ बेसिस पॉईंट्सची वाढ दिसून आली आहे. बँकेचा ऑपरेटिंग प्रॉफिट १४% वाढीसह २,५५३ कोटी रुपयांवर झेपावला आहे.
एसेट क्वालिटी आणि कर्ज पोर्टफोलिओमधील प्रगती
आर्थिक शिस्तीच्या जोरावर बँकेने आपल्या ताळेबंदातील खराब कर्जांचे प्रमाण (NPAs) उल्लेखनीयरीत्या कमी केले आहे:
ग्रॉस एनपीए (GNPA): मार्च तिमाहीतील १.६१% वरून घसरून जून तिमाहीत १.५१% वर आला आहे.
नेट एनपीए (NNPA): मागील तिमाहीतील 0.48% वरून सुधारून 0.44% वर स्थिरावला आहे.
प्रोविज़िंग खर्च( NPA खात्यासाठी ): मागील वर्षाच्या १,६५९ कोटी रुपयांच्या तुलनेत घटून या तिमाहीत १,१४४ कोटी रुपयांवर आला आहे.
बँकेचा एकूण कस्टमर बिजनेस (ज्यामध्ये सर्व प्रकारची कर्जे आणि ठेवींचा समावेश होतो) १८.६% वाढीसह ६,०४,७७६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये कर्ज आणि ॲडव्हान्सेस पोर्टफोलिओ २०.६% वाढून ३,०५,३७० कोटी रुपये झाला असून, मॉर्गेज, वाहन कर्ज आणि कॉर्पोरेट लोन सेगमेंटमधील वाढीने यात मोलाची भूमिका बजावली आहे.
गुंतवणूकदारांसाठी भविष्यातील दिशा
वाढत्या स्पर्धेच्या आणि बदलत्या व्याजदर चक्राच्या वातावरणातही बँकेने आपली आर्थिक पकड मजबूत ठेवली आहे. बँकेचा रिटर्न ऑन ॲसेट्स (RoA) सुधारून १.०६% झाला आहे. येत्या काळात बँक आपल्या डिपॉझिट मोबिलाइजेशनला आणि लोन ग्रोथला कसा वेग देते, यावर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार आहे.







