देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने NSE च्या प्रस्तावित ३० हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीत सहभागी होत समूहाच्या मालकीतील सुमारे १ टक्क्यांपर्यंत हिस्सा कमी करण्याची तयारी दर्शविली आहे.
NSE च्या प्रस्तावित प्रारंभिक समभाग विक्रीकडे बाजाराचे लक्ष लागले असताना, स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय आणि तिची उपकंपनी एसबीआय कॅपिटल मार्केट्स यांनी आपला हिस्सा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय समूह एकत्रितपणे सुमारे १ टक्क्यांपर्यंत हिस्सा विकू शकतो.
एसबीआयचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी सांगितले की, प्रस्तावित समभाग विक्रीत एसबीआय सहभागी होणार आहे. त्यानुसार एसबीआयकडून ०.६५ टक्के आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्सकडून ०.३५ टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, इतर भागधारकांच्या सहभागानुसार प्रत्यक्ष विक्रीचे प्रमाण कमी होऊ शकते.
NSE मधील एसबीआय समूहाची किती मालकी?
सध्या एसबीआयकडे NSE चा ३.२३ टक्के हिस्सा आहे. तर एसबीआय कॅपिटल मार्केट्सकडे ४.३३ टक्के हिस्सा आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांची मिळून लक्षणीय भागीदारी असून, प्रस्तावित हिस्सा विक्रीनंतर या गुंतवणुकीचा काही भाग खुल्या बाजारात उपलब्ध होईल.
शेट्टी यांनी स्पष्ट केले की, सध्या एसबीआयच्या इतर उपकंपन्यांचे भांडवलीकरण किंवा हिस्सा विक्री करून निधी उभारण्याचा कोणताही तातडीचा विचार नाही.
अलीकडेच एसबीआय आणि त्यांची परदेशी भागीदार संस्था अमुंडी यांनी एसबीआय म्युच्युअल फंडातील सुमारे १० टक्के हिस्सा विकला होता. सुमारे ९,८०० कोटी रुपयांच्या या सार्वजनिक विक्रीला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, ती तब्बल ४२ पट भरली होती.
विक्रीनंतर एसबीआयचा एसबीआय म्युच्युअल फंडातील हिस्सा ६१.७६ टक्क्यांवरून ५५.४६ टक्क्यांपर्यंत कमी झाला. अमुंडीचा हिस्सा ३२.५६ टक्क्यांवर आला असून, त्यात ३.७ टक्क्यांची घट झाली आहे.







